रविवार, १९ जून, २०११

लग्नातील देणी घेणी

लग्नातली देणी-घेणी

उन्मत्तसिंग नावाचा एक अत्यंत जुलमी राजा होता. त्याच्या छळाला व अत्याचाराला कंटाळून त्याची प्रजा आपआपली गावे सोडून, दुसऱ्या राज्यात जाऊ लागली. त्याचा प्रधान चतूर व प्रामाणिक होता, पण राजाला काही सांगू जाणं, म्हणजे स्वत:चं मरण स्वत:च ओढवून घेण्यासारखं होतं. त्यामुळे राजाला ताळ्यावर कसं आणावं, हा त्याच्यापुढे प्रश्न पडला.
एकदा तो प्रधान शिकारीसाठी रानात बराच दूरवर गेला असता त्याला एका झाडाखाली जप करीत बसलेला साधू दिसला. प्रधानाने घोडयावरुन उतरुन व त्या साधूजवळ जाऊन त्याला नमस्कार केला असता साधूनं त्याला विचारलं, 'कोन तुम्ही ?'
प्रधान म्हणाला, 'मी या राज्याचा मुख्य प्रधान आहे.'
ते एकुण गोसाव्यान विचारलं, 'राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा स्थलांतर करीत असताना, ते केवळ उघडया डोळ्यांनी बघत राहण्यासाठीच तुम्ही प्रधान झाला आहात काय?
यावर प्रधान म्हणाला, गोसावीबुवा ! मग मीही तुम्हाला विचारतो की, राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा घरेदारे सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागली असताना तुम्ही केवळ 'राम राम' म्हणत राहून स्वत:चीच मुक्ती साधणार आहात काय ? ज्या समाजाच्या जिवावर आजवर तुम्ही जंगलात त्याला या जुलुमजबरदस्तीतून मुक्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं हे तुमचं कर्तव्य नाही का?'
प्रधानाच्या या प्रतिप्रश्नान काहीसा ओशाळून तो गोसावी म्हणाला, 'प्रधानजी ! मला झेपेल अशी कोणतीही कामगीरी तुम्ही मजवर सोपवा. या राज्याच्या जुलमी राजाला ताळ्यावर आणण्यासाठी मी माझे प्राणही पणाला लावीन . सुचतो आहे का तुम्हाला एखादा उपाय?' तो गोसावी याप्रमाणे म्हणताच त्या चतुर प्रधानाच्या मनात काहीतरी कल्पना आली आणि त्याने ती हळूच त्या गोसाव्याला सांगितली. गोसाव्याने त्याप्रमाणे वागण्याचे वचन देताच प्रधान तिथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी राजा उन्मत्तसिंगाचा दरबार भरला असता, एक सेवक आत आला आणि राजाला म्हणाला, 'महाराज ! पक्ष्यांची भाषा जाणणारा एक बैरागी बाहेर आला असून, तो आपली भेट घेऊ इच्छितो. त्याला आत पाठवू का?'
राजानं होकार देताच, आदल्या दिवशी प्रधानाला रानात भेटलेला तो गोसावी दरबारात आला व राजाला नमस्कार करुन म्हणाला, 'महाराज ! मी बहुतेक सर्व पक्ष्यांची भाषा जाणतो. मजकडून काही सेवा करुन घ्यायची असल्यास आपण ती घ्यावी. मला त्याबद्दल पैसे वगैरे काहीच नकोत.'
राजा प्रधानाला म्हणाला, 'प्रधानजी, आज संध्याकाळी आपण दोघे फ़िरायला जाऊ तेव्हा बैरागीबुवांनाही आपल्याबरोबर घेऊन जाऊ.' राजा असे म्हणाला व त्याने एका सेवकाला त्या गोसाव्याची राहण्या-जेवणाची चांगली व्यवस्था ठेवण्यास सांगितले.
संध्याकाळी फ़िरायला जाताना राजा व प्रधान यांच्याबरोबर अर्थातच तो गोसावीही होता. ते तिघे त्या राजधानीच्या शहराबाहेर जातात न जातात, तोच राजाने एका झाडाच्या फ़ांदीवर बसलेले पक्षी आपापसात चिवचिवत असलेले पाहिले. त्यांच्याकडे बोट दाखवून राजाने त्या गोसाव्याला विचारलं, 'बैरागीबुवा ! हे दोन पक्षी एकमेकांशी कय बोलत आहेत हो?'
त्या गोसाव्यानं त्या दोन पक्ष्यांच चिवचिवण थोडा वेळ लक्षपूर्वक ऎकल्याचा आव आणला आणि तो राजाला म्हणाला, ' महाराज ! ते दोन पक्षी एकमेकांशी  जे बोलत आहेत, त्याचा अर्थ जर मी आपल्याला सांगितला, तर आपण मला जिवंत ठेवणार नाही.'
यावर राजानं अभय देताच तो गोसावी निर्भिडपणे म्हणाला, 'महाराज ! त्या फ़ांदीवरच्या दोन पक्ष्यांपैकी जो डाव्या बाजूला बसला आहे, त्याची मुलगी लग्नाची असून त्याने आपली मुलगी उजव्या बाजूला असलेल्या पक्ष्याच्या मुलाला देण्याची गोष्ट त्या पक्ष्याकडे काढली. यावर वरपिता असलेला तो पक्षी त्याला म्हणाला, 'तुझी मुलगी मी सून म्हणून आनंदाने स्वीकारतो, पण मुलीबरोबर 'स्त्रीधन' म्हणून शंभर गावे आंदण द्यायची तुझी तयारी आहे काय?'
राजा आश्चर्यानं म्हणाला, 'अरे वा: ! असं म्हणतोय तो वराचा बाप ? मग वधूचा बाप घासाघीस करुन, आदंण म्हणून द्यावयाच्या गावांची संख्या पन्नास पाऊणशेवर आणू पाहत असेल नाही का?'
गोसावी म्हणाला, 'नाही महाराज! तिथे उलटाच मामला चाललाय. वधूपिता परराज्यातून उडून आलेल्या वरपित्याला म्हणतो आहे, अहो. शंभरच काय घेऊन बसलात, सध्याच्या राजाची जुलमी राजवट जर अशीच आणखी एक वर्षभर चालू राहिली, तर वर्षभरात पाचशे गावातले लोक आपली घरदारं सोडून परराज्यात रहायला जातील. मग ती ओस पडलेली पाचशेच्या पाचशे गावं माझ्या भावी जावयाला मी आंदण म्हणून देईन. मात्र तुमच्या मुलाचं व माझ्या मुलीचं लग्न सध्या जमवून ठेवायचं आणि वर्षभरानं लावायचं.'
वास्तविक त्या दोन पक्ष्यांच्या चिवचिवण्याचा हा सोयीचा व केवळ काल्पनिक अर्थ त्या गोसाव्याने प्रधानाने आदल्या दिवशी त्याला केलेल्या मार्गदर्शनानूसार  राजाला सांगितला, पण राजाला तो खरा वाटून, तो एकदम शरमून गेला. त्या दिवसापासून त्याच्यात बराच फ़रक पडला व तो प्रजेचं अपत्यवत पालन-पोषण करु लागला.

चतुर व्हा

 चतुर व्हा

शरीर सुंदर सतेज । वस्त्रे भूषणें केलें सज्ज ॥
अंतरी नसता चातुर्य-बीज । कदापी शोभा न पावे ॥

- समर्थ रामदास

सध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा , या दोन गोष्टींनी ग्रासलं आहे . भारताचे भावी आधारस्तंभ असलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो, आपल्या अंगचा सज्जनपणा न सोड्ता, जर या परिस्थितीवर मात करुन तुम्हाला आपली ध्येये साध्य करायची असतील तर, अंगी चातुर्य बाणविण्याची आत्यंनतीक गरज आहे.
परंतु 'चातुर्य' म्हणजे काय , हे ठाऊक आहे ? चातुर्य म्हणजे शहाणपणा, धोरणीपणा , मुत्सद्दीपणा, हजरजबाबी वृत्ती, धुर्तपणा, दूरदर्शीपणा, प्रसंगावधानता वगैरे गुणांच माणसाच्या डोक्यात तयार झालेलं एकजीव असं रसायन.
माणूस केवळ विद्वान असल्याने त्याचा या जगात निभाव लागत नाही. अंगी चातुर्य नसलेला विद्वान एखाद्या प्रसंगात सापडला, तर आपण या प्रसंगात का सापडलो, याची मुद्देसुद मीमांसा ही इतरांपुढे करीत बसतो, परंतु अंगी चातुर्य असलेला माणूस असे विवरण करीत न बसता, आल्या प्रसंगावर मात करतो आणि आपली यशाची वाटचाल आक्रमू लागतो; थोडक्यात सांगायचं तर, विद्वत्ता ही नुसती बोलघेवडी असते, तर चातुर्य हे कृतिशील म्हणजे प्रत्यक्ष कृती करुन दाखविणारे असते. म्हणून जोश बिलिंग्ज नावाचा पाश्चात्य विचारवंत म्हणतो,

भावार्थ - विद्वत्ता ही ग्रंथालयांतून झोपा काढत व घोरत असते, तर चातुर्य हे संभाव्य प्रसंगाला तोंड देण्यासाठी अगदी जागरुकतेनं एका पायावर उभे असते.

अंगी चातुर्य नसलेली माणसं भोवताली कितीही असली, तरी एकटा चतुर माणूस त्या सर्वांवर मात करु शकतो. आगऱ्यास औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या शिवप्रभुंनी फ़ुलादखानाच्या पहाऱ्यातून आपल्या पुत्रासह पलायन केले, ते चातुर्याच्या जोरावरच ना ? म्हणून समर्थ म्हणतात..
उदंड बाजार मिळाले । परी ते धूर्तचि आळिले ।।
धूर्तापासी काही न चाले । बाजाऱ्यांचे ।।

भावार्थ - बाजारबुणगे जरी संख्येनं बरेच असले, तरी धूर्त म्हणजे चतूर माणूस त्यांना ताब्यात ठेवतो. धूर्तापुढे त्या अलबत्या गलबत्त्यांचे काहीएक चालत नाही.

गाढव आणि त्याचा निर्दय धनी

गाढव आणि त्याचा निर्दय धनी

   एक गाढव मोठा सहनशील होता. त्याचा धनी त्याजकडून त्याच्या शक्तिपलीकडे काम करून घेत असे व त्यास पोटभर खाऊही घालत नसे. अशा स्थितीत त्या गाढवाने आपल्या धन्याची नोकरी पुष्कळ वर्षे केली. तो गाढव म्हातारा झाला असता, एके दिवशी त्याच्या धन्याने त्याच्या पाठीवर एवढे ओझे लादले की त्याच्या भाराने तो अगदी खचून गेला. रस्ता अवघड व खांचखळग्यांचा असल्यामुळे थोडयाच वेळाने त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. हे पाहताच धनी त्याला निर्दयपणाने मारू लागला. त्यावेळी तो गाढव पडल्यापडल्याच आपली मान वर करून त्यास म्हणाला, ‘अरे कृतघ्न माणसा! हे सगळे नुकसान होण्यास तुझाच दुष्टपणा कारण आहे. तू पहिल्यापासूनच मला कधीही पोटभर खाऊ घातले नाहीस व माझ्या सामर्थ्यापलीकडे ओझे माझ्या पाठीवर लादलेस, त्याचा हा परिणाम.’

तात्पर्य :- कित्येक लोक असे कृतघ्न आणि निर्दय असतात, की आपली सेवा प्रामाणिकपणाने करणाऱ्या लोकांसही छळण्यास ते कमी करीत नाहीत.

कोल्हा, रानमांजर आणि ससा

कोल्हा, रानमांजर आणि ससा

एक लहानसा भित्राससा एका बिळात राहात असे; त्याने एके दिवशी, कोल्हा आपणास धरून मारून खाण्यासाठी बिळाच्या तोंडावर टपून बसला आहे असे पाहिले. परंतु बिळाचे तोंड लहान असल्यामुळे त्यातून कोल्ह्यास आत येणार नाही, हे पाहून, सशाचे भय थोडेसे कमी झाले. पुढे एके दिवशी, कोल्हा एका रानमांजराबरोबर मोठया सलगीने बोलत बसला आहे, असे त्याच्या दृष्टीस पडले. हे चिन्ह काही बरे नाही, असे त्यास वाटले. थोडया वेळाने, ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्यास आपल्या पंजांनी असे ओरबाडू लागले की, सशास आपला जीव वांचविण्यासाठी बिळातून बाहेर पडावे लागले! तो तेथे कोल्हा बसलाच होता, त्याने त्याजवर झडप घालून त्यास पकडले व रानमांजरासह त्याच्या मांसावर ताव मारण्यास सुरवात केली. मरतेवेळी ससा म्हणाला, `तुम्हा दोघा लुच्चांची मैत्री झाली असे जेव्हा मी पाहिले, तेव्हाच आपली आता धडगत नाही, अशी माझी खात्री होऊन चुकली होती.'

तात्पर्य :- एकमेकांशी शत्रुत्व करणाऱ्या दोन मनुष्यांची मैत्री झाली, की एखादया गरीबावर धाड आलीच म्हणून समजावे.

गरुड आणि घुबड

गरुड आणि घुबड

 
एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली; व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, `गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,' गरुड म्हणाला, `खरेच, तुझी पिल्लें कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.' घुबड म्हणाले, `ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, शब्द सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.'
पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ` किती घाणेरडी , कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.' असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !
आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, `गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.' गरुड म्हणाला, `मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?'

तात्पर्य:- स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटांत पाडून घेतो.